सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची खैर नाही; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः रस्त्यावर, ‘ॲक्शन मोड’ सुरू


जळगांव १६ मे २०२६ : सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर आणि रस्त्यांच्या कडेला ग्रुप करून दारू पिणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिला आणि कुटुंबांमध्ये या प्रकारांमुळे मोठी उद्विग्नता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अशा विरुद्ध अत्यंत कठोर आणि धडक मोहीम हाती घेतली आहे.

आज सायंकाळपासून संपूर्ण जळगांव जिल्ह्यात या विशेष कारवाईला वेग आला असून, पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे दारूबाजांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस प्रशासनाने या मोहिमेत खालील ४ प्रमुख मुद्द्यांवर तात्काळ आणि दृश्य स्वरूपात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे:
१. ओपन स्पेसमध्ये दारू पिणाऱ्यांवर जागेवरच कठोर कारवाई शहरातील आणि जिल्ह्यातील खुल्या मैदानांवर, उद्यानांमध्ये किंवा निर्जन ठिकाणी ग्रुप करून दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी थेट छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई केवळ दंडात्मक न राहता, समाजाला स्पष्ट संदेश जाईल अशा ‘ॲक्शन’ स्वरूपात केली जात आहे.
२. वाईन्स शॉप आणि कारमधील ‘मद्यपीं’ना दणकाअनेक वाईन्स शॉपच्या बाहेर आडोशाला, तसेच दुकानांच्या परिसरात स्वतःच्या कार पार्क करून आतमध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. अशा वाहनांची तपासणी करून कारमध्येच मद्यपान करणाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत.
३. हॉटेलबाहेर उघड्यावर पिणाऱ्यांवर वचक,परवाना नसतानाही अनेक छोट्या हॉटेल्स, धाबे किंवा टपऱ्यांच्या बाहेर ग्राहकांना उघड्यावर दारू पिण्याची मुभा दिली जाते. अशा हॉटेल्सवर आणि उघड्यावर बसणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
४. ‘दृश्य’ कारवाई: पोलिसांचा ॲक्शन प्लॅन थेट जनतेसमोर!या संपूर्ण मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कारवाई “दृश्य” (Visible) स्वरूपात केली जात आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेली कारवाई समाजाला प्रत्यक्ष दिसावी, जेणेकरून कायद्याचा धाक निर्माण होईल आणि सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल, यावर पोलीस अधीक्षक धिवरे यांनी विशेष भर दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः मैदानात; नागरिकांकडून कौतुक सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना स्वतः रस्त्यावर उतरावे लागले. त्यांच्या या थेट सहभागामुळे पोलीस दलात कमालीची तत्परता दिसून येत असून, नागरिकांनी आणि विशेषतः महिला वर्गाने या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. “सार्वजनिक ठिकाणी चालणारा हा उच्छाद रोखण्यासाठी अशीच कायमस्वरूपी आणि कडक कारवाई सुरू राहावी,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




