आरोग्यराज्यस्थानिक बातम्या

जळगाव कचरा डेपोच्या संथ कामावर लोकप्रतिनिधींचा संताप; प्रशासनाला दिला तीव्र इशारा!

जळगाव दि.10 (धर्मेंद्र राजपूत) शहरातील डम्पिंग ग्राऊंडच्या अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या कामावर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, गजानन मामा देशमुख यांनी शुक्रवारी कचरा डेपोच्या (डम्पिंग) कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

कामाला गती द्या अन्यथा कचरा टाकू देणार नाही- उपमहापौर 

दरम्यान पुण्यातील मोशी येथील डम्पिंग ग्राऊंडवर झालेली भीषण दुर्घटना आपल्याकडे घडू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेण्याच्या आणि सुरक्षा उपाययोजना कडक करण्याच्या सूचना उपमहापौर व सभापतींनी मनपा प्रशासनाला व ठेकेदाराला दिल्या. तसेच संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा वेग तात्काळ वाढवण्याचे आदेश दिले.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात….

डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे आणि निघणाऱ्या विषारी धुरामुळे आजूबाजूच्या खेड्यांमधील तसेच जळगांव मनपा क्षेत्रातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. परिसरात त्वचेचे विकार (स्किन इन्फेक्शन) आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण आढळून येत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. “नागरिकांच्या जिवाशी चाललेला खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

अधिकाऱ्यांसमोर मांडल्या समस्या 

या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर आपल्या तीव्र व्यथा आणि समस्या मांडल्या. प्रशासनाने कामात कोणतीही दिरंगाई न करता, लवकरात लवकर नागरिकांना या आरोग्याच्या त्रासातून मुक्त करावे, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button