सांस्कृतिक कार्यक्रमशैक्षणिकस्थानिक बातम्या

कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा; जळगावात महारांगोळी व जीवनदर्शन प्रदर्शनाचे आयोजन

कर्मवीरांचे नातू अनिल पाटील यांच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा

जळगाव : (धर्मेंद्र राजपूत) दि.12 थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शन’ जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव व रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरत असल्याची माहिती नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख व डॉ. एस. एस. राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा परिचय खान्देशातील जनतेला आणि विद्यार्थी वर्गाला व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या तीन दिवसीय जीवनदर्शन प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था, सातारा येथील कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे चेअरमन तथा कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि समाजपरिवर्तनाच्या महान कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगावची स्थापना झाली. हे प्रदर्शन दिनांक १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्मवीरांच्या समग्र जीवनप्रवासावर साकारण्यात आलेली भव्य महारांगोळी तसेच त्यांच्या जीवनकार्यावरील दुर्मिळ छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींचे (व्हिडिओ) विशेष सादरीकरण असणार आहे.

 

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित या ऐतिहासिक व प्रेरणादायी प्रदर्शनाचा लाभ जळगाव शहर व परिसरातील सर्व नागरिक, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एल. पी. देशमुख, डॉ. एस. एस. राणे तसेच मा. श्री. अनिल पाटील यांच्यासह आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button