महापौर दीपमाला काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी ‘श्री सरस्वती वहनाचे’ भक्तीमय स्वागत
१५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन; मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिताताई यांची उपस्तिती
जळगाव : ( धर्मेंद्र राजपूत) श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ वर्षांच्या प्राचीन व ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या श्रीराम रथोत्सवातील ‘श्री सरस्वती वहन‘ सोहळा शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल पंचमी) अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. जळगांव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे व नगरसेविका ॲड.शुचिताताई अतुलसिंह हाडा यांच्या रामदास कॉलनी येथील निवासस्थानी वहनाचे उत्साहात आगमन झाले.

या प्रसंगी आयोजित पानसुपारी कार्यक्रमास मंत्री गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत प्रभू श्रीरामचंद्र व श्री सरस्वती मातेचे दर्शन घेतले.
मंत्रोच्चार आणि टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत
रथयात्रेदरम्यान वहन निवासस्थानी दाखल होताच श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आणि ब्रह्मवृंदांचे अत्यंत पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. वेदघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने संपूर्ण रामदास कॉलनी परिसर दुमदुमून गेला होता. महापौर दीपमाला काळे व नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सहकुटुंब वहनाची विधिवत पूजा व महाआरती केली.

मान्यवरांची मांदियाळी आणि स्नेहमीलन
या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ, उप महापौर मनोज चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक विशाल भोळे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी श्री सरस्वती वहन व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन जळगावकरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उपस्थित सर्व भाविक आणि मान्यवरांचे पानसुपारी देऊन स्वागत करण्यात आले. भक्ती, परंपरा आणि आपुलकीचा संगम असलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.



