आरोग्यस्थानिक बातम्या

फटाके विक्रेत्यांनो सावधान! नियमभंग केल्यास होणार कडक कारवाई; जळगावात उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून दुकानांची अचानक पाहणी

जळगाव:( धर्मेंद्र राजपूत) दि.3 दिवाळी सणाच्या तोंडावर जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत फटाके खरेदीसाठी हजारो ग्राहकांची गर्दी उसळत असतानाच, काही व्यापाऱ्यांकडून सुरक्षेला हरताळ फासला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमहापौर मनोज चौधरी व महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीत फटाके दुकानदारांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून तळघरांमध्ये आणि शेजारील जुन्या घरांमध्ये फटाक्यांचा प्रचंड बेकायदेशीर साठा दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे.

सुभाष चौक ते राजकमल टॉकीज या अत्यंत गजबजलेल्या भागात दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. याच भागात मोठी दुर्घटना घडू शकते, हे लक्षात घेऊन उपमहापौर मनोज चौधरी, उपायुक्त पंकज गोसावी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने सायंकाळी ५ वाजता अचानक दुकानांवर छापे टाकले. या झाडाझडतीत दुकानदारांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.

 

कारवाईदरम्यान उघड झालेली गंभीर परिस्थिती:

• दुकानदारांची मोठी चलाखी: पथकाने ८ ते १० दुकानांची तपासणी केली असता, काही दुकानदारांनी दुकानांच्या तळघरांमध्ये (बेसमेंट) आणि आजूबाजूला असलेल्या जुन्या, बंद घरांमध्ये फटाक्यांचे बेकायदेशीर गोदामाच थाटल्याचे समोर आले.

 

• सुरक्षेची निव्वळ ‘स्टंटबाजी’: आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी दुकानांमध्ये कोणतीही ठोस यंत्रणा नव्हती. केवळ देखावा म्हणून कुठे एक-दोन सिलिंडर तर कुठे फक्त पाण्याच्या बादल्या ठेवून सुरक्षेचा निव्वळ सोहळा केला जात होता.

• अधिकृत परवानेच गायब: तपासणी दरम्यान अनेक फटाके विक्रेत्यांकडे व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैध परवाने आणि आवश्यक कागदपत्रेच मिळून आली नाहीत.

• अरुंद रस्ते अन् प्रचंड धोका: बाजारपेठेतून बाहेर पडण्याचे मार्ग अत्यंत अरुंद आहेत. अशा अरुंद जागेत विद्युत यंत्रणेची सुरक्षा नसणे आणि ज्वालाग्रही फटाक्यांचा ओव्हरस्टॉक असणे म्हणजे जळगावकर नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडल्यासारखेच आहे.

उपमहापौर भडकले; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

या बेजबाबदार व्यवसायाची भीषणता पाहून उपमहापौर मनोज चौधरी आणि मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरच तीव्र संताप व्यक्त केला. “व्यापाऱ्यांनी नफ्यासाठी नागरिकांच्या आणि निष्पाप ग्राहकांच्या जिवाशी खेळू नये,” अशा कडक शब्दांत त्यांनी दुकानदारांना सुनावले. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व दुकानांचे तातडीने जागेवरच पंचनामे करून, त्यांचा परवाना आणि साठवणूक क्षमतेची कसून चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपमहापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button