डंपिंग ग्राउंडवरील कामाचा मनपा आयुक्त महापौर उपमहापौर यांनी घेतला आढावा

जळगाव, दि.1 : दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० वाजेच्या दरम्यान जळगाव डंपिंग ग्राउंड येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची मनपा आयुक्त जीवणे सर ,महापौर दीपामाला काळे उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग क्र 9 नगरसेविका प्रतिभा देशमुख, जयश्री पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर उपायुक्त गायकवाड, शहर अभियंता आर डी पाटील, प्रकल्प अधिकारी योगेश वाणी आरोग्य अधिकारी समीर बोरोले व संबंधित ठेकेदार तसेच पीएमसी इंजिनियर यांवेळी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान डंपिंग ग्राउंडवरील काही कामांची सुरुवात हि अत्यंत संथ गती आहे तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत आढळून आलेल्या त्रुटी आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाबाबत गंभीर बाबी निदर्शनास आल्या. विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदारांना आजच्या पाहणीबाबत पूर्वसूचना देण्यात आलेली असतानाही पाहणीच्या वेळी काही संबंधित ठेकेदार प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नव्हते.

सदर डंपिंग ग्राउंडवरील विविध कामांना मागील २ ते ३ वर्षांपूर्वी वर्कऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. मात्र, पाहणीदरम्यान काही कामांना वर्कऑर्डर मिळूनही संबंधित ठेकेदारांनी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केलेली नसल्याचे निदर्शनास आले. तर काही कामे केवळ १२ ते १३ टक्क्यांपर्यंतच पूर्ण झालेली असून, काही कामांची प्रगती सुमारे ६० टक्क्यांपर्यंतच झालेली असल्याचेही आढळून आले. एवढा मोठा कालावधी उलटूनही कामांची अपेक्षित प्रगती न झाल्याने आयुक्त, महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याबाबत तसेच कामांना गती देण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही प्रत्यक्ष कामात अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नसल्याने संबंधित अधिकारी व अभियंत्यांना जाब विचारण्यात आला.
यावेळी स्थानिक नागरिकांनीही कामांच्या संथ गतीबाबत आणि गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, शहर अभियंता, संबंधित अभियंते, प्रकल्प अभियंता तसेच संबंधित ठेकेदार यांच्याकडे आपल्या समस्या व तक्रारी मांडल्या.
नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आयुक्त, महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. वर्कऑर्डर मिळूनही कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांकडून तातडीने काम सुरू करून घ्यावे. तसेच अपूर्ण कामांना गती देऊन सर्व प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, उपमहापौर यांनी जळगाव शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबतची (Air Quality) माहितीही घेतली. संबंधित हवेच्या गुणवत्तेचा अहवाल व उपलब्ध आकडेवारी स्वतंत्रपणे जोडण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
डंपिंग ग्राउंडवरील कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, वर्कऑर्डर मिळूनही कामे सुरू न करणे, काही कामांची अत्यल्प प्रगती, कामांच्या गुणवत्तेतील त्रुटी आणि नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी याबाबत आता कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी तातडीने कामकाजात सुधारणा करून सर्व कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा कडक सूचना आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी यावेळी दिल्या




