आरोग्यराज्यशैक्षणिक

गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत आदर्श गुरूकूल राज्यात प्रथम

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज - डॉ. शिल्पा नारायणन

जळगाव, दि. २३ (धर्मेंद्र राजपूत) : सत्य, अहिंसा, धर्म, प्रेम आणि शांती हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित नसावे ते कृतीतून आचरणात आणावे. जगण्यातून अनुभवाला येते ते सत्य, निसर्गाप्रतीची संवेदनशीलता ही अहिंसा, कर्तव्यातून दिसतो तो धर्म, अपेक्षेशिवाय केले जाते ते प्रेम आणि सर्वांचा संगम जेथे असतो तेथे शांती असते, असे प्रतिपादन अप्पासाहेब पटवर्धन सफाई आणि पर्यावरण तंत्र निकेतन, देहू, पुणेच्या संचालिका डॉ.शिल्पा नारायणन यांनी व्यक्त केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६’ मधील विजेत्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांचा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे होते तर जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने, विश्वस्त ज्योती जैन व डॉ. गीता धरमपाल हे ही व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत बोलतांना त्या म्हणाल्या कि, कचरा जाळणे म्हणजे ‘धन’ नष्ट करणे असून प्लास्टीक कचरा जाळल्याने घातक वायू बाहेर पडून विविध प्रकारचे कॅन्सर होतात, तसेच जैविक कचरा कुजल्याने खत होते. यासारख्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार म्हणून रुजले पाहिजे. डिजीटल युगात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. शारीरिक, आंतरिक व सामाजिक स्वच्छतेबाबत योग्य जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आजही असल्याचे स्पष्ट करतांना पालक व शिक्षकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण ठरते. आईच्या संस्कारांचा आपल्या पाल्यांवर विशेष प्रभाव असतो असेही त्यांनी संशोधनातून सिद्ध झाल्याचे सांगितले.

 

डिजीटल कचरा हा ज्वलंत प्रश्न – अशोक जैन

अध्यक्षीय मनोगतात अशोक जैन यांनी आपण जन्माला आलो त्यापेक्षा या पृथ्वीतलावरून निरोप घेताना हे जग अधिक सुंदर कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. सोशल मिडीयाचे व्यसन प्रत्येकाला लागत आहे. त्यातील चांगले काय आणि वाईट काय हे समजून या डिजीटल कचऱ्यापासून आपण दूर झालो पाहिजे, कचरा होऊच द्यायचा नाही यासाठी स्वयंशिस्त प्रत्येकाने पाळली पाहिजे. त्यासाठी शैक्षणिक धोरणांमध्ये अभ्यासक्रमातच प्राथमिक स्तरावर वाहतूकीचे नियम व स्वच्छतेबाबत विशेष तरतूद असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद हा भविष्यातील पिढी घडवित असतो त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढते.

स्वच्छ शाळा स्पर्धा हि देश परिवर्तनाची प्रयोगशाळा – आदित्य जीवने

प्रत्येक गावातील शाळा ही तेथील ऊर्जेचे केंद्र असते. या शाळेतूनच देशाचे भविष्य घडत असते. स्वच्छता या विषयावर गांधी रिसर्च फाऊंडेशने घेतलेली ही प्रतियोगिता ही विचार, संस्कार व देश घडविणारी प्रयोगशाळा आहे. चांगली जीवनशैली अंगिकारणारे जबाबदार नागरिक याद्वारे घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्कृती बदलविता येऊ शकते असेही ते म्हणाले.

 

रोख पारितोषिकासह सन्मान चिन्हाने गौरविले…

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील ८० तालुक्यांमधील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यंदा प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन तसेच डिजिटल जनजागृती या विषयांनाही स्पर्धेच्या मूल्यांकनामध्ये विशेष महत्त्व दिले गेले. सहभागी शाळांपैकी १७ जिल्ह्यांतील ४३ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड झाली या सर्व शाळांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या शाळेला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले. तसेच जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार तर उत्तेजनार्थ ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ही पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टीस्ट लि. तर्फे प्रायोजित होती.

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या शाळा..

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर यांना, ग्रामीणस्तरावर प्रथम क्रमांकाने अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, डोंगर कठोरा, ता. यावल, जि. जळगाव, द्वितीय क्रमांकाने शाहबाबू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर, ता. पातूर, जि. अकोला, तृतीय क्रमांकाने ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर, तर उत्तेजनार्थ म्हणून भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे यांना गौरविण्यात आले. तालुकास्तर प्रथम क्रमांकाने श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर, ता. नवापुर, जि. नंदुरबार, द्वितीय क्रमांक सरस्वती विद्या निकेतन, खानापूर, ता. मोर्शी, जि. अमरावती तर तृतीय क्रमांकाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव, ता. जि. जळगाव, उत्तेजनार्थ म्हणून दलवाई हायस्कूल, मिरजोळी, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी विजयी झाले. तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, केज, ता. केज, जि. बिड, द्वितीय क्रमांकाने लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुंढवा, ता. हवेली, जि. पुणे तर तृतीय क्रमांकाने भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी, ता. हवेली, जि. पुणे, तसेच उत्तेजनार्थ म्हणून अनुभूति इंग्लिश मिडियम स्कूल, जळगाव यांना पारितोषिक प्राप्त झालीत.

 

 

मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छ शाळा प्रतियोगितेतील सहभागी शाळांच्या उपक्रमांचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. यानंतर सहभागी शाळांच्यावतीने ७ शिक्षकांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करतांना गांधी तीर्थ स्वच्छ शाळा उपक्रमामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमधे झालेल्या आमूलाग्र बदलाचा आवर्जून उल्लेख केला. प्रास्ताविकात गिरीश कुळकर्णी यांनी प्रतियोगितेबाबत माहिती दिली. स्वच्छता ही केवळ शाळेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घर, परिसर आणि समाजापर्यंत पोहोचावी, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत सूर्यवंशी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ‘अरे रिकामा कशाला फिरतो तुझं गावच नाही का तीर्थ..’ हे भजन म्हटले. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button