आरोग्यस्थानिक बातम्या

झाडांसाठी ‘तीन चाकी जलदूत’ डॉ. निलेश चांडक यांचा पर्यावरणपूरक उपक्रम

चार वर्षांपासून जळगाव भुसावळ महामार्गालगत वृक्षारोपण; झाडे जगवण्यासाठी स्वतः तयार केली विशेष तीन चाकी सायकल

जळगाव दि.23 (धर्मेंद्र राजपूत) झाडे लावणे महत्त्वाचेच; पण लावलेली झाडे जगवणे त्याहून अधिक महत्त्वाचे असते. हाच विचार कृतीत उतरवत चांडक कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक व निसर्गप्रेमी डॉ. निलेश चांडक यांनी जळगाव–भुसावळ महामार्गालगत वृक्षसंवर्धनाचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरु केला आहे. चांडक कॅन्सर हॉस्पिटलसमोरील जळगाव–भुसावळ महामार्गाच्या परिसरात डॉ. निलेश चांडक यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी वृक्षारोपणाला सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी सातत्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे काम ते करत आहेत. यंदाही त्यांनी नवीन झाडे लावली असून, या झाडांना नियमित आणि सहजपणे पाणी देता यावे यासाठी त्यांनी एक अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

झाडांना पाणी देण्यासाठी डॉ. चांडक यांनी खास तीन चाकी सायकल तयार केली आहे. या सायकलवर पाण्याची व्यवस्था करून महामार्गालगत लावलेल्या झाडांपर्यंत सहज पोहोचता येते आणि प्रत्येक झाडाला पाणी देता येते. विशेष म्हणजे केवळ संकल्पना मांडून न थांबता डॉ. चांडक स्वतः या सायकलच्या माध्यमातून झाडांना पाणी देत आहेत.

 

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. चांडक यांनी रुग्णसेवेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली आहे. चार वर्षे सातत्याने वृक्षारोपण करणे, लावलेल्या झाडांची काळजी घेणे आणि आता त्यांच्या संवर्धनासाठी स्वतःची अभिनव पाणीपुरवठा व्यवस्था उभी करणे, हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. आज अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात; मात्र त्यानंतर झाडांच्या संगोपनाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. “फक्त झाड लावायचे नाही, तर ते जगवायचेही आहे,” हा संदेश डॉ. निलेश चांडक यांच्या कृतीतून समाजासमोर येत आहे.

 

जळगाव–भुसावळ महामार्गाच्या कडेला आज वाढत असलेली ही हिरवाई त्यांच्या चार वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष देत आहे. एक डॉक्टर रुग्णांचे जीवन वाचवण्यासोबतच झाडांचेही आयुष्य जपण्यासाठी अशा कल्पक पद्धतीने पुढाकार घेतो, ही बाब जळगावकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आणि इतरांसाठी अनुकरणीय आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button