क्राईमआरोग्यस्थानिक बातम्या

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई;

ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव, दि.1 : मा. सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. 72/1998 दि.27/9/2001 च्या अंतरिम आदेशानुसार दिवाळी सणाच्या कालावधीत ध्वनी व हवा प्रदूषणामुळे होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी या निर्देशांचे पालन करून दिवाळी सण सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, पाचोरा , भूषण अहिरे यांनी केले आहे.

 

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, पर्यावरण (संरक्षण) नियमांमधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

 

फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करण्यास बंदी आहे. तसेच साखळी फटाक्यांसाठी निर्धारित ध्वनी मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांनुसार प्रतिबंधित असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करता येणार नाही.

 

फटाके वाजविण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजविण्यास मनाई आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील शांतता क्षेत्रात कोणत्याही वेळी फटाके वाजविण्यास परवानगी नाही.

 

ध्वनी व हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके तसेच नियमबाह्य साखळी फटाके आढळल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.

 

सणांच्या कालावधीत कोणतेही अपघात घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

नागरिकांनी फटाके वाजविताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, मा.न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करून दिवाळीचा आनंद सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button