मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव, दि.३१ ऑक्टोबर (जिमाका) : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्यासाठी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर दावे व हरकती सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकतींचा निपटारा करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत राहणार असून, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावातील किंवा अन्य तपशिलांतील दुरुस्ती करणे अथवा हरकत नोंदविणे आवश्यक असलेल्या पात्र नागरिकांनी वरील मुदतीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, बीएलओ यांच्याकडे किंवा https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.




