

जळगाव (धर्मेंद्र राजपूत)दि 28 :शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली अटी व शर्तींचे उल्लंघन करून जळगाव शहरात अनधिकृतपणे फलकबाजी करणाऱ्या बड्या कंपन्या आणि नामांकित व्यावसायिकांना जळगाव महानगरपालिकेने आज जोरदार दणका दिला. मनपा प्रशासनाने आज शहरात धडक मोहीम राबवून ‘भंगाळे गोल्ड’, ‘बिर्ला गोल्ड’, ‘अदानी’ आणि ‘आर एल ग्रुप’ सारख्या नामांकित संस्थांचे तब्बल १९० पेक्षा जास्त जाहिरात बोर्ड जप्त केले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील अनधिकृत जाहिरातदारांचे धाबे दणाणले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच दिली होती नोटीस!
शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी मनपाने जाहिरातदारांना काही कडक अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. नियमांनुसार, लावण्यात येणाऱ्या बोर्डवर ६० टक्के जागा स्वतःच्या जाहिरातीसाठी आणि २० टक्के जागा महानगरपालिकेच्या शासकीय जाहिरातींसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते. तसेच यासाठी मनपाची रीतसर ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे अनिवार्य होते. मात्र, या अटींचे सर्रास उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसीला केराची टोपली दाखवणे अखेर या व्यावसायिकांना भोवले आहे.

कुठे आणि कोणावर झाली कारवाई?
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज सकाळीच वेगवेगळ्या पथकांद्वारे संपूर्ण शहरात एकाच वेळी कारवाई सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने खालील भागात मोठी जप्ती करण्यात आली:
नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन (गोविंदा स्टॉप मार्ग): मनपा प्रशासकीय इमारतीसमोरून ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंत ‘बिर्ला गोल्ड’ आणि ‘अदानी’ या कंपन्यांचे ७० ते ७५ जाहिरात बोर्ड जप्त करण्यात आले.
स्टेडियम ग्राउंड ते गांधी बगीचा मार्ग: या मुख्य रस्त्यावर ‘भंगाळे गोल्ड’चे नियमबाह्य लावलेले तब्बल ८० ते ९० बोर्ड मनपाने उखाडून जप्त केले.चित्रा चौक ते झाशी राणी पुतळा मार्ग: या परिसरात जळगावातील नामांकित ‘आर एल ग्रुप’चे ३० ते ४० जाहिरात बोर्ड जप्त करण्यात आले.अतिक्रमण विभागाचा कडक इशाराशहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि मनपाच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. आज झालेल्या या धडक कारवाईमुळे शहरात दिवसभर याच विषयाची चर्चा रंगली होती. आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मनपा सूत्रांनी दिले आहेत.




