विठ्ठल रुखमाईच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे नवनिर्माण होणार
आमदार अनिल पाटील यांची वाडी मंदिरास भेट,वारीत जाऊन प पु संत प्रसाद महाराजांशीही केली चर्चा


अमळनेर:-विठ्ठल रुखमाईच्या कृपाआशीर्वादाने आणि शासन मदतीने श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे नवनिर्माण होऊन वारकरी संप्रदायातील हे प्रमुख धार्मिक स्थळ लवकरच अजून तेजाने खुलेलं अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी वाडी मंदिरास भेटी प्रसंगी दिली.
या भेटीनंतर त्यांनी भडगाव येथे प्रत्यक्ष वारीत जाऊन प पु संत प्रसाद महाराजांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली.यावेळी त्यांच्यासोबत मंदिराचे विश्वस्त व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुरवातीला संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार पाटील म्हणाले की हे मंदिर अमळनेरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून लवकरात लवकर मंदिराचे नवनिर्माण होण्यासाठी प्रयत्न आहेत. हे संस्थांन पर्यटन विभागाकडे ब वर्गात असुन याच विभागाच्या माध्यमातून निधी मिळवू त्यासोबतच अ वर्ग करण्यासाठी देखील प्रयत्न करू आणि राज्य शासनाकडून जास्तीतजास्त निधी मिळविण्यासाठी शिखर संस्थेपर्यंत जाऊ यासाठी प्रस्ताव करण्याच्या कामाला तातडीने लागावे अश्या सूचना आमदारांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.विश्वस्त मंडळाशी देखील त्यांनी पुढील हलचालीबाबत चर्चा करून घटनेच्या दिवशी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांनी अग्निशमन विभागाचे कौतुक केले.यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे,संस्थानचे राजेंद्र भामरे,महेश कोठावदे,उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी यासह नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी साधला महाराजांशी संवाद
या दुर्घटनेमुळे अमळनेर येथील वाडी संस्थानच्या ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक वारशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना या घटनेमुळे व्यथित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या नवंनिर्माणसाठी शासन नक्कीच मदत करेल अशी हमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प पु संत प्रसाद महाराजांना दिली.आमदार अनिल पाटील हे प्रसाद महाराजांना भेटण्यासाठी भडगाव येथे गेले असता त्यांच्या मोबाईलद्वारे श्रीमती पवार यांनी महाराजांशी संवाद साधला.आमदारांनी महाराजांना माहिती देताना सांगितले की मुंबई येथे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधिमंडळातही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करून शासनाकडे आपत्कालीन निधीची मागणी केली आहे.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि शासन याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.तर महाराजांनी देखील साक्षात विठ्ठल माऊली व लाखो भक्तगण आपल्या सोबत असल्याने चिंता नसल्याचे सांगितले.आमदारांनी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर महाराज दिंडीकडे मार्गस्थ झाले.यावेळीही आमदारांसोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




