क्राईम
माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ; पोलीस उपनिरीक्षकाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी NC दाखल


जळगाव (विशेष प्रतिनिधी) : चाळीसगाव येथे आयोजित जनआक्रोश धरणे आंदोलनात पोलीस उपनिरीक्षकाबाबत कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या (शिंदे गट) नेता व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आंदोलनादरम्यान केली होती टीका
पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी रविवारी, २८ जून रोजी चाळीसगाव शहरात विविध संघटना आणि नागरिकांच्या वतीने ‘जनआक्रोश धरणे आंदोलन’ पुकारण्यात आले होते. या आंदोलनात माजी खासदार उन्मेश पाटील देखील सहभागी झाले होते.
आंदोलकांसमोर बोलताना उन्मेश पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मात्र, हे भाषण करताना त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांच्याबाबत सार्वजनिक व्यासपीठावरून अत्यंत अपमानास्पद आणि बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
उन्मेश पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित जनसमुदायासमोर पोलीस उपनिरीक्षकाची प्रतिमा मलिन झाली असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, अशी तक्रार गोपनीय शाखेचे अंमलदार यांनी पोलिसात दिली. या तक्रारीच्या आधारे चाळीसगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.




