क्राईम

पाचोरा येथे जळगाव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम लुटण्याचा धाडसी दरोड्याचा डाव आज पहाटे फसला

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी; गॅस कटरने SBI चे ATM फोडणाऱ्या टोळीचा थरारक पाठलाग, ८.८९ लाख वाचवले!

पाचोरा दि.17 (धर्मेंद्र राजपूत ): जळगांव जिल्हातील पाचोरा शहरानजीक असलेल्या जारगाव येथे आज पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी बँक चोरी टळली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने एसबीआयचे (SBI) एटीएम मशीन कापून लाखो रुपयांची कॅश पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी डाव हाहून पडला. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी गाडीसह पलायन केले, ज्यांचा पोलिसांनी धुळे जिल्ह्यापर्यंत थरारक पाठलाग केला.

 

पहाटे पावणेचार वाजता पोलिसांची ‘अ‍ॅक्शन’

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रोडवरील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे एटीएम काही अज्ञात तरुण फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळ गाठले.

 

काळ्या रंगाची क्रेटा आणि ३ तरुण; असा घडला थरार

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. एटीएमचे कॅश कॅबिनेट गॅस कटरने कापून चोरट्यांनी ते बाहेर काढले होते. तीन तरुण हे कॅश कॅबिनेट एका काळ्या रंगाच्या ह्युंदाई क्रेटा गाडीत (क्र. MH 49 CS 7028) भरण्याच्या तयारीत होते. मात्र, समोर अचानक पोलीस काळ बनून उभे ठाकलेले पाहताच चोरट्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी कॅबिनेट तिथेच टाकले आणि गाडीत बसून तारखेड्याच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला.

 

धुळे जिल्ह्यापर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग, ‘अलर्ट’ जारी

पाचोरा पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) माहिती देत चोरट्यांच्या क्रेटा गाडीचा थरारक पाठलाग सुरू केला. पोलिसांनी या चोरट्यांचा धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत पाठलाग केला. दरम्यान, दरोडेखोर आंतरराज्य टोळीचे असण्याची शक्यता गृहीत धरून पुढील सर्व टोल नाके, धुळे पोलीस आणि थेट मध्य प्रदेश (MP) बॉर्डरवरील पोलीस नियंत्रण कक्षालाही सतर्कतेचा इशारा (कमीयुनिकेशन अलर्ट) देण्यात आला असून नाकेबंदी करण्यात आली आहे.

८ लाख ८९ हजारांची रोख सुरक्षित, बँकेचा निष्काळजीपणा?

समोर पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे एटीएममधील तब्बल ८,८९,७००/- रुपयांची रोकड चोरीला जाण्यापासून सुरक्षित राहिली आहे. जळगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, दुसरीकडे बँकेचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे. एवढी मोठी घटना घडून आणि पोलिसांनी रोकड सुरक्षित ठेवूनही ‘एसबीआय’चे एटीएम टेक्निशियन आणि संबंधित स्टाफ मात्र बराच वेळ उलटूनही घटनास्थळी पोहोचला नव्हता, ज्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याप्रकरणी पाचोरा पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू असून, लवकरच ही टोळी गजाआड होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button