

जळगाव दि.1(धर्मेंद्र राजपूत) जळगाव पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर शहर व परिसरातून वाढलेल्या अवजड वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या २३ दिवसांत पाच निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगावकरांच्या जीविताच्या प्रश्नावर नगरसेवक अरविंद देशमुख यांनी वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदने व तक्रारी देत संभाव्य धोके निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होणे हा त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा पहिला ठोस परिणाम मानला जात आहे.
वेळोवेळी निवेदने, लेखी तक्रारी आणि इशारे देऊनही दुर्लक्ष; रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, अपुरी सुरक्षा व्यवस्था, अवजड वाहतुकीचे नियोजन, बायपासचा प्रश्न आणि यंत्रणांतील समन्वयाचा अभाव वारंवार आणला होता निदर्शनास; आता जबाबदार प्रत्येकाची भूमिका तपासण्याची मागणी
उपलब्ध फिर्यादीतील माहितीनुसार ‘अँग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे एम.डी.शैलेंद्र सिंघल, कंपनीचे जी.एम. दत्ता आणि संबंधित साइट अधिकारी अशा एकूण तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यातील नमूद कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांनी आधीच दिले होते गंभीर इशारे..
बायपास बंद झाल्यानंतर अवजड वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत अरविंद देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आवाज उठविला होता. ८ ऑगस्ट रोजी NHAI प्रशासनाकडे पत्र देऊन पाळधी तरसोद बायपासची किमान एक मार्गिका दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळीही अपघात व मृत्यूंचा प्रश्न उपस्थित करून पुढील जीवितहानी टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर मृतांची संख्या वाढत गेल्यानंतर देशमुख यांनी पुन्हा NHAI तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तातडीचे रोड सेफ्टी ऑडिट, महामार्गावरील खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती, रिफ्लेक्टर, रम्बलर्स, दिशादर्शक व धोक्याचे फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था, अवजड वाहनांचे सुरक्षित नियमन आणि धोकादायक ठिकाणी तातडीच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती.
यासोबतच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून तातडीची संयुक्त बैठक घेण्याची मागणीदेखील देशमुख यांनी केली होती.
चार बळींनंतर दिला होता स्पष्ट इशारा “पाचव्या बळीची वाट पाहू नका!”
चार नागरिकांचे प्राण गेल्यानंतर देशमुख यांनी प्रशासनाला अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, “आता पाचव्या बळीची वाट पाहू नका.” दुर्दैवाने त्यानंतरही आणखी एक नागरिक मृत्युमुखी पडला आणि अवघ्या २३ दिवसांत मृतांची संख्या पाचवर पोहोचली.
देशमुख यांनी वेळोवेळी रस्त्यांची दुरवस्था व खड्डे, अपुरी रस्ता सुरक्षा व्यवस्था, अवजड वाहतुकीचे सदोष नियोजन, बायपास बंद असताना पर्यायी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा अभाव, धोकादायक ठिकाणी आवश्यक सूचना व सुरक्षात्मक उपायांचा अभाव आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला होता.
त्यामुळे आता पोलिस तपासात या सर्व बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
“गुन्हा दाखल झाला म्हणजे विषय संपला नाही”
“आम्ही निवेदने दिली, तक्रारी केल्या, अपघातांची वाढती संख्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि संभाव्य जीवितहानीबाबत वारंवार सावध केले. त्यामुळे आता तपासात कोणाला कोणत्या तारखेला धोक्याची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर संबंधितांनी कोणती कारवाई केली, कोणती केली नाही आणि ती का केली नाही, याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.
तसेच बायपास बंद झाल्यानंतर शहरातील अवजड वाहतुकीचे नियोजन कोणाच्या जबाबदारीत होते, रस्त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी कोणी करायची होती, आवश्यक उपाययोजना वेळेत का झाल्या नाहीत आणि संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कर्तव्यात कोणती त्रुटी झाली का, हे तपासातून स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“पाच बळी म्हणजे पाच आकडे नाहीत; ते पाच उद्ध्वस्त संसार आहेत. जळगावकरांचा जीव कवडीमोल नाही. गुन्हा दाखल होणे ही केवळ पहिली पायरी आहे. आमच्या पूर्वीच्या प्रत्येक निवेदनाची आणि तक्रारीची तपास यंत्रणेने दखल घेऊन, पुराव्यांच्या आधारे ज्यांची जबाबदारी निश्चित होईल त्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आता सहावा बळी आम्हाला मान्य नाही,” असे अरविंद देशमुख यांनी स्पष्ट केले.
पाचही मृतांच्या कुटुंबांना न्याय, महामार्गावर तातडीची सुरक्षितता आणि कायदेशीररीत्या जबाबदार ठरणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.




