रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने


जळगाव (धर्मेंद्र राजपूत):महाराष्ट्र शासनाने राज्यातील ५९ अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जळगाव महानगर वतीने आज, मंगळवार दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
जातीनिहाय जनगणनेशिवाय उपवर्गीकरण नकोपक्षाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत संपूर्ण राज्याची जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत शासनाने अनुसूचित जातींचे कोणतेही उपवर्गीकरण करू नये. या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे बौद्ध समाजाचे ९०% पर्यंत नुकसान होऊ शकते, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे.दलित समाजात फूट पाडण्याचा प्रयत्नआरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास दलित समाजातील वेगवेगळ्या जातींमध्ये आपापसात भांडणे आणि वाद निर्माण होऊन समाजात फूट पडू शकते. दलित समाजात एकजूट असणे अत्यंत आवश्यक आहे. हाच एकतेचा संदेश घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लोकशाही मार्गाने हे आंदोलन छेडले असून, शासनाने ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनाप्रसंगी जिल्हा सचिव भरत मोरे, भीमराव साळुंखे, प्रताप बनसोडे, दादाराव अडकमोल, अक्षय मोरे, हरीष शिंदे, मिलींद अडकमोल, विमलबाई सपकाळे,सोनाली अडकमोल,उज्वला अडकमोल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




