जळगाव शहरात पोलिसांचे पहाटेच ‘कोंबिंग ऑपरेशन’; १२५ हून अधिक सराईत गुन्हेगारांची कसून चौकशी!


जळगाव: शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटेपासून अत्यंत धडक आणि विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे ४.०० वाजल्यापासून जळगाव शहर आणि परिसरात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगार, स्थानिक आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध ही विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या नियोजित कारवाईत विविध गुन्ह्यांमध्ये फरार आणि सक्रिय असलेल्या १२५ हून अधिक अट्टल (सराईत) गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी हे पाऊल उचलेले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण दूर होण्यास मदत होईल. शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली.
संवेदनशील भागात एकाच वेळी छापे
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अत्यंत गुप्तता पाळत पहाटेच्या सुमारास शहरातील सर्व संवेदनशील आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी केली. चोख नाकेबंदीमुळे १२५ पेक्षा जास्त आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
जनतेकडून पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या या धडक कारवाईचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही आणि भविष्यातही अशा मोहिमा सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
कारवाईसाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक (RCP) पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांरी सह विभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.




