क्राईमराजकीयराज्य

कोट्यवधींचा ‘पाळधी-तरसोद’ महामार्ग पहिल्याच पावसात खचला; निकृष्ट कामाचे पितळ उघडे, प्रशासनाकडून वाहतूक बंद!

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि.1 शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण (बायपास) राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा दर्जा पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेला आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने या महामार्गाची दैना उडवली असून, मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ महामार्ग दोन्ही बाजूंनी दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे. या गंभीर प्रकारामुळे जळगावकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महामार्गाच्या गुणवत्तेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक तातडीने बंद

महामार्ग खचल्याची माहिती मिळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. कोणतीही मोठी जीवितहानी किंवा भीषण दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने थांबवली आहे. सध्या या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

पहिल्याच पावसात कोट्यवधींचा खर्च पाण्यात?

जळगाव शहराला वाहतूक कोंडीतून मुक्ती देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्याचे पितळ उघडे पडले. कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी खर्च करूनही जर रस्ता एका पावसाचा मारा सोसू शकत नसेल, तर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनी काय केले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

जनतेच्या पैशांची होळी; चौकशीची मागणी

या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा संशय आता बळावला आहे. पहिल्याच पावसात रस्ता खचल्यामुळे कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button