धावत्या रेल्वेतील चोरीचा छडा: अट्टल चोरटा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


जळगाव: दि.9 जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या तडफदार कामगिरीमुळे धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
गुन्ह्याचा तत्पर तपास
०८ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद मोर्या नावाचे प्रवासी झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांच्या बॅगेची चोरी झाली होती. बॅगेत तब्बल १,६५,०००/- रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागीणे होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग झाल्यानंतर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रभावी कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक नेमले. या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तत्पर कारवाई केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन याला फातेमा नगर, जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला असून, या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलिसांनी एका मोठ्या चोरट्याला पकडण्यात यश मिळवले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली. पोलीस प्रशासनाच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, पोलिसांचे कौतुक केले जात आहे.




