स्थानिक बातम्याआरोग्यराज्य

जळगावच्या पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त भार नको; स्टेडियमसाठी स्वतंत्र जलव्यवस्था मागणी 

शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन शासनाकडे आमदार राजूमामा भोळे यांची मागणी

जळगाव, दि.7 (धर्मेंद्र राजपूत ) : जळगाव शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ तसेच भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्ध साठ्यावर कोणताही अतिरिक्त भार पडू नये, यासाठी शहरात नव्याने तयार होत असलेल्या स्टेडियम/क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र जलस्रोत अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी शासनाकडे केली आहे.

 

यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त यांना स्वतंत्र पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. जळगाव शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असून शहराच्या वाढीव भागांमध्येही पाणीपुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतूनच शहरातील नागरिकांची गरज पूर्ण करताना अनेक आव्हाने आहेत. त्यात भविष्यात शहराची हद्दवाढ झाल्यास नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांची पाण्याची गरजही वाढणार आहे. त्यामुळे आजच्या गरजेबरोबरच पुढील अनेक वर्षांच्या पाणीगरजेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार भोळे यांनी म्हटले आहे.

 

शहराच्या पाण्यावर अतिरिक्त भार नको

नवीन स्टेडियम किंवा मोठ्या क्रीडा संकुलासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता राहणार आहे. मात्र, त्यासाठी जळगाव शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडल्यास त्याचा परिणाम भविष्यात शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे स्टेडियमसाठी स्वतंत्र जलस्रोत, स्वतंत्र पाणी आरक्षण अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारण्याचा पर्याय शासन व संबंधित विभागांनी तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

पर्यायी जलस्रोतांचा अभ्यास करण्याची मागणी

संबंधित प्रकल्पासाठी उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून व्यवहार्य पर्याय निश्चित करावा. प्रकल्पाची पाण्याची गरज स्वतंत्रपणे भागविण्यासाठी आवश्यक नियोजन व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“जळगाव शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा हक्क आणि भविष्यातील पाणीगरज हा कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये. नवीन विकासकामांना विरोध नाही; मात्र त्यासाठी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये. त्यामुळे संबंधित प्रकल्पासाठी स्वतंत्र जलव्यवस्था करणे हा अधिक दूरदृष्टीचा आणि दीर्घकालीन उपाय ठरेल,” असे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.

 

जळगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत प्रस्तावित हद्दवाढ, नवीन निवासी भाग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, उद्योग व इतर नागरी सुविधांची भविष्यातील पाणीगरज लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार भोळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठ्याचे संरक्षण करतानाच भविष्यातील पाणीगरज लक्षात घेऊन आवश्यक जलस्रोत व पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button