जळगाव शहरात कचऱ्याचे साम्राज्य; फुले मार्केटची दुरवस्था, ‘स्वच्छ जळगाव’ अभियान नावालाच?


जळगाव: दि.6 (धर्मेंद्र राजपूत) ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अशी घोषणा देणाऱ्या जळगाव शहरात सध्या नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, जळगावची व्यापारी पेठ आणि मुख्य केंद्र असलेल्या महात्मा फुले मार्केटमधील परिस्थिती तर अत्यंत खराब झाली असून, नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
चालणेही झाले दुरापास्त; नाकाला रुमाल लावल्याशिवाय पर्याय नाही
फुले मार्केटमध्ये सकाळी 11 च्या सुमारास कचरा आणि घाणीचे ढीग साचले आहेत. या ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी रस्ताही उरलेला नाही. कचऱ्याची दुर्गंधी इतकी तीव्र आहे की, बाजारात पाऊल ठेवताच नाकाला आणि तोंडाला रुमाल किंवा हात लावावा लागतो. या घाणीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
शहराला ‘स्वच्छ आणि सुंदर’ बनवण्याच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. मुख्य बाजारपेठेची ही अवस्था असेल, तर इतर गल्लीबोळांमधील परिस्थिती काय असेल, याचा अंदाज लावलेलाच बरा. नियमित कर भरूनही जळगावकरांच्या पदरी केवळ घाण आणि आजारपण का, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
उद्देश एकच: जळगाव ‘आपले’ आहे, काळजीही सर्वांनीच घ्यावी!
या बातमीचा किंवा परिस्थितीवर बोट ठेवण्याचा आमचा एकमेव उद्देश कोणावर टोमणेमारणे नसून, “जळगाव शहर हे आपले आहे” ही भावना प्रत्येकाच्या मनात जागी करणे हा आहे. जोपर्यंत आपण स्वतः आपल्या शहराची काळजी घेत नाही, तोपर्यंत कोणतेही अभियान यशस्वी होऊ शकत नाही. जळगावला सुंदर बनवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच व्यापारी, ग्राहक आणि प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे काळाची गरज बनले आहे.




