स्थानिक बातम्याक्राईम

उत्सवाच्या काळात जळगाव अंधारात! अनेक भागांत पथदिवे बंद अवस्थेत

जळगाव:दि 7 (धर्मेंद्र राजपूत) सध्या जळगाव शहरात उत्सवाचा काळ सुरू होत असून, नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. मात्र, अशा आनंदाच्या आणि उत्सवाच्या वातावरणात जळगाव शहर मात्र अनेक ठिकाणी अंधाराच्या साम्राज्यात चाचपडत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक चौकांमध्ये पथदिवे बंद असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

अनेक ठिकाणी काळोख, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

शहरातील अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स पूर्णपणे बंद आहेत. अनेक ठिकाणी पोल उभे आहेत, पण त्यावर लाईटच नाही; तर काही ठिकाणी लावलेले दिवे तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर प्रचंड काळोख निर्माण होत असल्याने महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरी आणि छेडछाडीच्या घटना घडण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या पत्रांना प्रशासनाची केराची टोपली?

शहरातील या गंभीर समस्येकडे जळगाव शहराच्या महापौर, उपमहापौर आणि विविध प्रभागांमधील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधले आहे. सणासुदीचे दिवस पाहता शहरातील सर्व नादुरुस्त पथदिवे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या सूचना हवेतच विरल्याचे चित्र आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांना ऐन सणासुदीत अंधारात राहावे लागत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

 

नवरात्रीत दांडिया आणि गरब्यासाठी नागरिक, विशेषतः महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात. त्यानंतर पुढच्याच महिन्यात प्रकाशाचा सण असलेली दिवाळी येत आहे. त्यामुळे जळगाव महापालिका प्रशासन आतातरी झोपेतून जागे होणार का? आणि जळगावकरांना अंधारातून मुक्ती मिळणार का? हाच मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button