आरोग्यराजकीय

स्वच्छता अभियान ठरले ‘फार्स’! गोलाणी मार्केटमध्ये पुन्हा कचऱ्याचे ‘साम्राज्य’, व्यापारी त्रस्त

जळगाव दि.2 (धर्मेंद्र राजपूत): जळगाव शहरातील सर्वात गजबजलेले आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोलाणी मार्केट मधील अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठे स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच मनपाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे गोलाणी मार्केटमध्ये पुन्हा कचऱ्याची अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने येथील शेकडो दुकानदार आता तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

लिफ्टजवळ कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने व्यापारी हैराण गोलाणी मार्केटमधील ‘E’ विंगमधील दुसऱ्या मजल्यावर तर अस्वच्छतेने कळस गाठला आहे. येथील म्युझिक स्टेशनच्या शेजारी असलेल्या लिफ्टजवळ कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली असून, ग्राहकांना आणि दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, मार्केट मधील  ‘ मायटी ब्रदर्स’ यांच्या दुकानाच्या समोरही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

पावसाळा तोंडावर आलेला असताना अशा प्रकारे लिफ्टच्या कोपऱ्यात आणि मुख्य दुकानांसमोर कचरा साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.महानगरपालिकेने केवळ प्रसिद्धीसाठी ‘स्वच्छता मोहीम’ न राबवता, गोलाणी मार्केट मधील ‘E’ विंग आणि इतर मजल्यांवर सातत्याने साफसफाई करावी, अशी मागणी आता व्यापारी करू लागली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button