जळगाव मनपाची कारवाई: अनधिकृत होर्डिंगप्रकरणी ‘भंगाळे गोल्ड’ला पुन्हा 60 हजार 180चा दंड!


जळगाव:दि.24 (धर्मेंद्र राजपूत) शहरातील अनधिकृत होर्डिंगवर जळगांव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील कालिंका माता चौकातील भव्य होर्डिंग आणि इच्छा देवी चौकाजवळील ‘नमस्कार प्लाय’ शेजारील ३ अनधिकृत होर्डिंगप्रकरणी ‘भंगाळे गोल्ड’च्या संचालकांकडून ६० हजार १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. नरेंद्र अण्णा पाटील यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले होते. “प्रशासन सर्वसामान्य अतिक्रमणधारकांवर तात्काळ कारवाई करते, मग मोठ्या धनदांडग्या व्यावसायिकांना सूट का दिली जाते?” असा सवाल उपस्थित करत अॅड. पाटील यांनी अतिक्रमण विभागाला धारेवर धरले होते.
या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने संबंधित होर्डिंग मालकांना दंड ठोठावला. त्यानुसार ‘भंगाळे गोल्ड’च्या संचालकांनी ६० हजार १८० रुपयांचा धनादेश (चेक) मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे.
आतापर्यंत सव्वा लाखांची वसुली:
यापूर्वी देखील सुप्रसिद्ध हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही ६० हजार १८० रुपयांचा दंड वसूल झाला होता. अशा प्रकारे आतापर्यंत केवळ अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे व्यावसायिकांकडून एकूण १,२०,३६०/- (एक लाख वीस हजार तीनशे साठ) रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने यापुढेही अशीच निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




