जळगांव: मेहरूण तलावावर गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा; महापौर दीपमाला काळेंकडून गणेश घाटाची पाहणी


जळगाव दि.16 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची पाहणी करून श्री गणेश विसर्जन पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या वेळी शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान महापौरांनी गणेश विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाला सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश दिले. गणेश घाटावर भाविकांची सोय व्हावी यासाठी निर्माल्य कलशांची संख्या पुरेशी वाढवण्यात यावी. नागरिक व गणेश मंडळांनी निर्माल्य कोणत्याही प्लास्टिक पिशवीत न आणता कागदात गुंडाळून किंवा कागडी पिशवीत आणून थेट निर्माल्य कलशातच टाकावे. घरून निघताना कोणीही प्लास्टिक पिशवी सोबत आणू नये, अशा विविध सूचना महापौरांनी दिल्या आहेत.
विसर्जनादरम्यान जळगावकरांनी परिसर स्वच्छ ठेवावा. विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी न करता सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी. विसर्जन व्यवस्थेसाठी उपलब्ध असलेले तराफे, तैनात कर्मचाऱ्यांची संख्या तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांची महापौरांनी माहिती घेतली. विसर्जन काळात कार्यरत राहणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरवायच्या भोजन व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.




