

जळगांव दि.22 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (२२ जून २०२६) घोषित झाला असून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी या निवडणुकीत एकतर्फी आणि ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळवण्याचा नवा विक्रम केला आहे.निवडणुकीपूर्वी महायुतीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकरे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, महायुतीचे आमदार यांनी व्यक्त केलेला विश्वास अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. “जळगावची जागा ही संपूर्ण महाराष्ट्रात नंबर एकची जागा ठरेल आणि महायुतीचा उमेदवार ऐतिहासिक मताधिक्याने निवडून येईल,” हा दावा निकालाच्या आकडेवारीने सिद्ध करून दाखवला आहे.

अंतिम मतमोजणीची सविस्तर आकडेवारी निकालपत्रानुसार, निवडणुकीत एकूण ६१६ मतदान झाले होते, ज्यापैकी ६११ मते वैध ठरली तर ५ मते अवैध घोषित करण्यात आली.
महायुतीचा सुसाट विजय; विरोधक चारीमुंड्या चीत
या एकतर्फी लढतीत महायुतीचे नंदकिशोर महाजन यांना पहिल्या पसंतीची तब्बल ५८२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना केवळ १७ मतांवर समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना ११ तर रेश्मा काळे यांना अवघे १ मत मिळाले. नंदकिशोर महाजन यांनी ५६५ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे.
जळगावात महायुतीचा जल्लोष
निकालाची अधिकृत घोषणा होताच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणि संपूर्ण जिल्ह्यात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत प्रचंड जल्लोष सुरू केला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या अचूक नियोजनामुळेच हा ‘महाविजय’ शक्य झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या रेकॉर्डब्रेक विजयामुळे जळगाव जिल्ह्यावरील महायुतीची पकड पुन्हा एकदा मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे




