जळगाव: लाचखोरी प्रकरणातील शाखा अभियंता अहिरेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले शाखा अभियंता योगेश अहिरे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, या प्रकरणाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिमांड रिपोर्टमधील खळबळजनक खुलासे:एसीबीने सादर केलेल्या माहितीनुसार, या भ्रष्टाचार प्रकरणात केवळ अहिरे यांचाच सहभाग नसून एका नगरसेविकेच्या मुलाचा आणि काही “वरिष्ठ अधिकाऱ्यांचा” उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे जळगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.१५ लाखांची मागणी:सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश अहिरे याने स्वतःसाठी ७.५० लाख रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ७.५० लाख रुपये, अशी एकूण १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही मोठी रक्कम कोणासाठी आणि का मागितली गेली, याचा तपास आता पोलीस करणार आहेत.
वरिष्ठ अधिकारी रडारवर? रिमांड रिपोर्टमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संदर्भ आल्याने आता तपास यंत्रणा आपला मोर्चा त्या दिशेने वळवण्याची शक्यता आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती? त्यांचे आरोपीशी झालेले फोन कॉल, प्रत्यक्ष संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांची सखोल चौकशी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
तसेच मोठ्या आर्थिक किंवा संशयास्पद व्यवहारात चक्क एका विद्यमान नगरसेविकेच्या मुलाचे नाव समोर आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्यवहारामुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांत चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संशयास्पद व्यवहारात संबंधित व्यक्तीची नक्की काय भूमिका होती, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आर्थिक उलाढालीचे धागेदोरे राजकीय संबंधांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीबी लवकरच या प्रकरणाचा तपास हाती घेऊन संबंधितांची चौकशी करू शकते.



