चोरीच्या साखळीवर पोलिसांची नजर; भंगार दुकानांमधील संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा’वॉच’!”


जळगाव:दि.5 शहरासह जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलाने आज सायंकाळपासून एक मोठी ‘सर्च मोहीम’ हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व संशयित भंगार दुकानांची (Scrap Shops) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, चोरीच्या वस्तूंची विल्हेवाट लावणाऱ्या गुन्हेगारी साखळीचे कंबरडे मोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चोरीच्या दुचाकींचे ‘डिस्मेंटलिंग’ रडारवर
अनेकदा दुचाकी चोरी केल्यानंतर गुन्हेगार त्या गाड्यांचे इंजिन किंवा सुटे भाग सुटे करून भंगारात विकतात. यामुळे चोरीच्या गाड्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. भंगार दुकाने ही चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावण्याचे प्रमुख केंद्र (Vehicle Scraping Centers) बनल्याची दाट शंका पोलिसांना आहे. याच पार्श्वभूमीवर, आता कोणत्याही दुचाकीचे सुटे भाग किंवा संशयास्पद इंजिन भंगार दुकानात आढळल्यास दुकानदारावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांन तर्फे होऊ शकते

चोरीच्या मालाचा ‘ट्रॅप’ लावणाऱ्यांनो सावधान!
गुन्हेगारांकडून चोरीचा माल स्वस्तात विकत घेऊन तो पुन्हा ग्राहकांना विकणारी एक साखळी सक्रिय आहे. घरफोडीतील पितळी भांडी, रेल्वेचे रूळ, विजेच्या तारा, आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मोटर पंपांची चोरी करून ती भंगारात खपवली जातात. पोलिसांच्या या नव्या सर्च मोहिमेमुळे अशा चोरीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. “चोरीचा माल घेणाऱ्यांनो सावधान, आता तुमचा प्रत्येक व्यवहार पोलिसांच्या निगराणीत आहे,” असा इशारा या मोहिमेतून देण्यात आला आहे.




