प्रशासनाचा वाळू माफियांना दणका! प्रांताधिकारी विनय गोसावींच्या नेतृत्वात मध्यरात्री ‘धडक कारवाई’; ५ डंपर जप्त


जळगाव टाईम्स न्यूज: दि.7 गिरणा नदी पात्रातून गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वतः ‘ॲक्शन मोड’मध्ये येत गुरुवारी (६ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली. या धाडसी मोहिमेत अवैध वाळू आणि मुरूम वाहतूक करणारे एकूण ५ डंपर जप्त करण्यात आले असून, यामुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी कारवाई?
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, प्रांताधिकारी विनय गोसावी व त्यांच्या पथकाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्यावर सापळा रचला होता. जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता, त्यात चार डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास अवैध वाळू आणि एका डंपरमध्ये मुरूम आढळून आला. पथकाने तातडीने पाचही वाहने ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहने जमा
जप्त करण्यात आलेली पाचही वाहने सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीजवळ लावण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर संकेत दिले आहेत.
गिरणा पात्रातील उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करत होते. मात्र, वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याने स्वतः रस्त्यावर उतरून मध्यरात्री ही कारवाई केल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. “प्रशासनाने असाच धाक कायम ठेवल्यास अवैध धंद्यांना चाप बसेल,” अशा प्रतिक्रिया जळगावकर देत आहेत.



