Uncategorized

जळगांव: प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन उत्साहात

जळगाव, (धर्मेंद्र राजपूत) दि.22 : वाहनचालक हा समाजातील अविभाज्य घटक असून, त्यांची शिस्तप्रिय दिनचर्या, वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता तसेच अपघातविरहित सेवा देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. वाहनचालकांच्या कर्तव्यभावनेला आदर देण्याच्या उद्देशाने 17 सप्टेंबर हा राष्ट्रीय चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन साजरा करण्यात आला.

 

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ताटू, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर इंगळे, कार्यालय अधीक्षक अनिल ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

चालक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. परिवहन कार्यालयातील वाहनचालक तसेच कार्यालयात पक्क्या चाचणीसाठी व अवजड वाहन चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांची शारीरिक तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच 23 वाहनचालकांनी एचआयव्ही तपासणीत सहभाग नोंदविला. या उपक्रमास टीसीआय फाऊंडेशन, जळगाव तसेच गळवलकर चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र वर्मा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ताटू व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button