मेहरूण तलाव परिसरात गावठी कट्ट्यासह दहशत माजवणारा तरुण एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव:दि.27 जळगांव शहरातील मेहरूण तलाव परिसरात बेकायदेशीरपणे विनापरवाना गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा लोखंडी काळा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २४ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
२४ जून रोजी पो.उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात एक इसम स्वतःच्या ताब्यात विनापरवाना गावठी कट्टा बाळगून दहशत माजवत आहे. त्यांनी तातडीने ही माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, गणेश ठाकरे, पोकाँ किरण पाटील, पोकाँ नितीन ठाकूर, पोकाँ रमाकांत साळुंखे आणि पोकाँ सुभाष साबळे यांचे पथक संशयिताचा शोध घेण्यासाठी रवाना झाले.
पाठलाग करून आवळल्या मुसक्या
पोलीस पथकाने मेहरूण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ शोध सुरू केला असता, एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस अंमलदार गणेश ठाकरे आणि रमाकांत साळुंखे यांनी त्याचा थरारक पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
अंदाजे १० हजारांचा गावठी कट्टा जप्त
अटक करण्यात आलेल्या संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १०,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा गावठी कट्टा आढळून आला. या पिस्तुल ग्रिपच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाची प्लास्टिकची ग्रिप असून त्यावर काळा चिकटपट्टी गुंडाळलेली होती. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने आपले नाव समीर खान जावेद खान (वय २५ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा.जळगांव) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष गावठी कट्टा जप्त केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५७३/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक, संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे.




