विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुरक्षित! जळगाव पोलिसांची विशेष मोहीम
स्कूल बस, रिक्षा चालकांची 'ब्रेथ ॲनालायझर'द्वारे अचानक तपासणी


जळगांव दि. 25 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव पोलीस दलाने एक अभिनव व अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शाळा बस चालक तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची ब्रेथ ॲनालायझर’द्वारे अचानक मद्यपान चाचणी करण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित राहावा हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
हा उपक्रम केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करून राबविण्यात आलेली संवेदनशील आणि दूरदृष्टीची कृती आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविताना निश्चिंत राहावेत, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि शालेय वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव अधिक दृढ व्हावी यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे.
जळगाव पोलिसांचे हे कार्य समाजाभिमुख प्रतिबंधात्मक पोलीसिंगचे उदाहरण आहे. अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे हीच प्रभावी पोलिसी भूमिका आहे.




