जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा ‘हैदोस’; महापालिका तातडीने कारवाई करणार का?


JALGAON TIMES (धर्मेंद्र राजपूत) दि.3 जळगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर बनला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर काही महिन्यांपूर्वी एका निष्पाप चिमुकल्याला आपला जीवही गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनामुळे आता महापालिका प्रशासनाला नागरिकांचा रोषाला समोरे जावे लागतं आहे. त्यामुळे आता नागरिकाकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
अनेक नागरिक जखमी: गेल्या काही महिन्यांत शहरातील विविध भागांत, विशेषतः गोलाणी मार्केट परिसर, अयोध्यानगर, कृष्ण मंदिर परिसर, मटन मार्केट, टेलिफोन ऑफिस परिसर, येथे कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
निर्बीजीकरण मोहिमेची स्थिती: महापालिकेतर्फे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी (Sterilization) निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे किंवा कंत्राट दिल्याचे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी नसल्याचे दिसून येते. शहरात सुमारे 20 हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याचा अंदाज आहे, त्यापैकी केवळ काही हजारांचे निर्बीजीकरण झाले आहे.
न्यायालयाचे आदेश: सर्वोच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांहून मोकाट कुत्रे पकडून त्यांना निवाऱ्यात हलवण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रार कुठे करावी?: जळगाव मनपाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांक जाहीर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील उपद्रवाची तक्रार थेट जळगाव शहर महानगरपालिकेच्या संपर्क विभागात नोंदवावी
महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामकाज न करता, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.




