BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार सुरेश भोळे यांची मंत्री बाबासाहेब पाटील यांची मुंबईत भेट

जळगांव दि. 17 (धर्मेंद्र राजपूत) BHR मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे – राजूमामा यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने सविस्तर निवेदन सादर केले.
BHR मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवलेल्या हजारो ठेवीदारांच्या ठेवी गेल्या अनेक वर्षांपासून अडकून पडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठेवीदार आर्थिक अडचणीत असून, त्यांच्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, ही प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच, अवसायकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा आणि जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील जाहीर करावा, ठेवीदारांना परतावा देण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी तसेच मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने मदत करावी, ठेवीदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या परिस्थितीची सहकारमंत्र्यांना माहिती देत, या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करावी, तसेच ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी मांडली.




