दुष्काळाच्या सावटात बळीराजाला मायेचा आधार! जळगावात ४५ शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि दिवाळी फराळाचे वाटप

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.2 दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचवण्यासाठी जळगावच्या भरारी फाउंडेशनतर्फे ‘शेतकरी संवेदना अभियान’ अंतर्गत एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील ४५ अल्पभूधारक व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते तसेच दिवाळीचा फराळ आणि मिठाईचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मदतीमुळे दुष्काळाच्या चिंतेत असलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमलले आहे.
१२ वर्षांची अविरत सेवा परंपरा
गेल्या १२ वर्षांपासून भरारी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात अविरतपणे ‘शेतकरी संवेदना अभियान’ राबवले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून रविवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळ आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहावे, यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात आला.
पाणी कमी लागणाऱ्या पिकांवर भर द्या: जिल्हाधिकारी रोहन घुगे
याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन केले. “दुष्काळामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे भर द्यावा,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच महिला शेतकऱ्यांचे मनोबल वाढवताना त्यांनी महिलांनी ‘गट शेती’च्या माध्यमातून पुढे यावे, असे आवाहन केले. शासनाच्या वतीने देखील शेतकऱ्यांसाठी खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करणार: आमदार सुरेश भोळे
कार्यक्रमाला उपस्थित असलेले जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विवंचनेची दखल घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या उपवर मुलींच्या लग्नाची चिंता सतावत आहे, अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आगामी काळात भव्य ‘सामूहिक विवाह सोहळ्याचे’ आयोजन करण्याचे आश्वासन आमदार भोळे यांनी याप्रसंगी दिले.
दात्यांचे लाभले मोलाचे सहकार्य…
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, भाग्यश्री सिड्स, पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी, सपन झुनझुनवाला, आदेश ललवाणी, विकास वाघ, रवींद्र फिरके, राहुल पाटील आणि बाळासाहेब सुर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अक्षय सोनवणे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक विधाते, सागर पगारिया, कैलास पटेल, रितेश लिमडा, नंदकिशोर बारी, भूषण खांबायत, शुभम राजपूत यांच्यासह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



