महात्मा गांधी उद्यानाबाहेर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण; पार्किंगचा प्रश्न गंभीर, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!


जळगाव:दि. 27 (धर्मेंद्र राजपूत ) शहरातील नागरिकांचे प्रमुख विरंगुळ्याचे केंद्र असलेल्या महात्मा गांधी उद्यानाबाहेरील परिसराला सध्या अतिक्रमणाचा मोठा विळखा पडला आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या आणि अनधिकृत वाहनांमुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिकांमधून केला जात आहे.
वाहन पार्किंगवरून वाद अपघाताची शक्यता?
शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी या उद्यानात लहान मुलांसह कुटुंबियांची मोठी गर्दी असते. मात्र, उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपल्या गाड्या अस्ताव्यस्तपणे लावल्या आहेत. यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर किंवा अनधिकृत जागेवर उभी करावी लागतात. अनेकदा पार्किंगच्या जागेवरून नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये तीव्र वादावादीचे प्रकार घडत आहेत. मुख्य रस्त्यावरील या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतः बघू शकतात की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे किंवा नाही
टवाळखोरांचा सुळसुळाट; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या परिसरात केवळ अतिक्रमणच नाही, तर संध्याकाळच्या वेळी टवाळखोर तरुणांचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच येथे हातगाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटात मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या टवाळखोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अतिक्रमण विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कार्यपद्धतीवर आता नागरिकांनी थेट बोट ठेवले आहे. या भागातील अतिक्रमणावर कोणतीही कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही बड्या विक्रेत्यांचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक साठेलोटे किंवा ‘जवळीक’ असल्यानेच या अतिक्रमणाला अभय दिले जात असल्याची जोरदार चर्चा जळगावकरांमध्ये आहे.
नागरिकांची मागणी: तातडीने कारवाई करा!
महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता, प्रत्यक्ष महात्मा गांधी उद्यान परिसराची पाहणी करावी. येथील सर्व अनधिकृत हातगाड्या हटवून पार्किंगची जागा मोकळी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाने येथे गस्त वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून जळगावकर नागरिकांना सुरक्षित वातावरणात विरंगुळा घेता येईल.




