ना वादळ, ना पाऊस! जळगावात मध्यरात्री अचानक कोसळले झाड; घराचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली


जळगाव दि.26 ( प्रियंका ): शहरातील अयोध्या नगर परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच थक्क करणारी घटना समोर आली आहे. कोणत्याही प्रकारचा वादळ-वारा किंवा पाऊस नसताना, मध्यरात्रीच्या सुमारास एक भलेमोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत एका दांपत्याच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर येथील गल्ली क्रमांक ४०/५ मधील रहिवासी राजेश तायडे यांच्या घरा शेजारी असलेले एक मोठे झाड काल रात्री सव्वा वाजेच्या सुमारास अचानक उन्मळून पडले. झाड थेट तायडे यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घराची पडदी (भिंत) कोसळली असून घराचे नुकसान झाले आहे
गणेश विसर्जनामुळे मुलगा बाहेर कुटुंब सुखरूप
ही घटना घडली तेव्हा तायडे कुटुंबातील सदस्य घरात गाढ झोपलेले होते. तर त्यांचा मुलगा परिसरातील इतर मुलांसोबत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गेलेला होता. झाड कोसळल्याचा प्रचंड आवाज झाल्याने आणि त्याच वेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने तायडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना तात्काळ जाग आली. नागरिकांनी घराबाहेर पडून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. अचानक घडलेल्या या संकटामुळे तायडे कुटुंब प्रचंड घाबरले होते, मात्र सुदैवाने सर्व सदस्य सुखरूप आहेत.

वीज कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू
घटनेची माहिती मिळताच वॉर्ड क्रमांक १६ मधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तायडे कुटुंबाला धीर दिला. झाड कोसळल्यामुळे तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.रात्रीपासूनच वीज कर्मचाऱ्यांकडून विजेचे खांब आणि तारा दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे




