७५ व्या अमृत महोत्सवात नाथाभाऊंचे ‘पॉवर’फुल शक्तीप्रदर्शन; पण महायुतीच्या आमदारांची ‘दांडी’ राजकीय घसरणीचे संकेत की ठरवून केलेली नाकेबंदी?


जळगाव/मुक्ताईनगर दि.2 (धर्मेंद्र राजपूत) :उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल चार दशके ज्यांचा दरारा राहिला, त्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांचा ७५ वा अमृत महोत्सव नुकताच मुक्ताईनगरमधील कोथळी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासारख्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला मोठी राजकीय झळाळी मिळाली. मात्र, जळगावच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या चर्चा सुरु झाल्या आहे.
भाऊंचं जिल्ह्यातलं राजकीय वजन खरंच कमी झालंय की ही महायुतीने ठरवून केलेली राजकीय नाकेबंदी आहे?
नाथाभाऊंच्या ७५ व्या वाढदिवसाचे निमंत्रण महायुतीतील सर्व बड्या नेत्यांना अगदी आग्रहाने देण्यात आले होते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील महायुतीमधील (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) एकाही विद्यमान आमदाराने किंवा खासदाराने या कार्यक्रमाला फिरकणे देखील पसंत केले नाही. थेट जिल्ह्याच्याच लोकप्रतिनिधींनी खडसेंच्या या मोठ्या सोहळ्याकडे फिरवलेली पाठ पाहून आता राजकीय वर्तुळात एकच सवाल विचारला जातोय–भाऊंचं जिल्ह्यातलं राजकीय वजन खरंच कमी झालंय की ही महायुतीने ठरवून केलेली राजकीय नाकेबंदी आहे?

दिग्गजांची मांदियाळी, पण ‘ स्थानिक’ नेत्यांची पाठ!
या अमृत महोत्सवी सोहळ्यात शरद पवार यांनी खडसेंचे कौतुक करताना, ‘महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात नाथाभाऊंचे योगदान अतुलनीय आहे,’ अशा शब्दांत गौरविले. तर रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज्यभरातून अनेक विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर हजर होते. पण ज्या जळगाव जिल्ह्याला नाथाभाऊंनी आपल्या हाताने उभे केले, ज्या भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले, त्याच पक्षाचे आणि महायुतीचे स्थानिक आमदार-खासदार या कार्यक्रमात कुठेही दिसले नाहीत.
राजकीय वजन घटल्याची चर्चा का?
राजकीय विश्लेषकांच्या मते, एकेकाळी जळगाव जिल्हा म्हणजे एकनाथ खडसे असे समीकरण होते. जिल्ह्यात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाचे तिकीट कटणार, याचे सगळे दोरे मुक्ताईनगरमधून हलत असत. मात्र, गेल्या काही वर्षांतील बदललेले राजकीय संदर्भ, पक्षांतराचे निर्णय आणि त्यानंतर निर्माण झालेली समीकरणे यामुळे स्थानिक नेत्यांनी खडसेंपासून अंतर राखणे सुरू केले आहे. अमृत महोत्सवासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वैयक्तिक सोहळ्यातही जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी घेतलेली ही भूमिका, नाथाभाऊंचा स्थानिक पातळीवरील वचक कमी झाल्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.

बदलत्या राजकीय संस्कृतीवर नाथाभाऊंचाच टोला!
महायुतीच्या नेत्यांच्या या गैरहजेरीमुळे नाथाभाऊंच्या मनातली खंतही लपून राहिली नाही. कार्यक्रमात बोलताना खडसे स्वतः भावुक झाले आणि त्यांनी बदलत्या राजकीय संस्कृतीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “२०१४ पूर्वी राजकारणात वेगळी संस्कृती होती. विरोधी पक्षात असलो तरी सुख-दुःखाच्या आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्व हेवेदावे विसरून नेते एकत्र येत असत. मात्र आताचे राजकारण पाहून मनाला वेदना होतात.” काही वरिष्ठ नेत्यांनी आणि जुन्या सहकाऱ्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या असल्या, तरी प्रत्यक्ष कार्यक्रमाला जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी दांडी मारल्याने नाथाभाऊंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
हा सोहळा जरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक असल्याचे भासवले गेले असले, तरी स्थानिक पातळीवरील आमदारांनी दाखवलेली पाठ ही निव्वळ योगायोग नक्कीच नाही. नाथाभाऊंनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांचा राजकीय संघर्ष अजूनही सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातल्याच तरुण आणि विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्रमाकडे केलेली दुर्लक्षाची खेळी ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात कमकुवत करण्याचा रणनीतीचा भाग तर नाही ना? असा जळजळीत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.




