राजकीयशेती

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची ‘नाला खोलीकरण मोहीम’: पहिल्याच पावसात धरणगाव तालुक्यातील जलस्रोतात होतेय वाढ

जळगाव :दि.25 (धर्मेंद्र राजपूत) यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यतेचा अंदाज घेत, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच पावसात अभूतपूर्व यश आले आहे. धरणगाव तालुक्यात झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे परिसरातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच पहिल्याच पावसात अशी स्थिती पाहायला मिळाल्याने धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान आज सकाळी प्रताप पाटील यांनी नारळ वाढवून जलपूजन केले.

 

गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू होती. या प्रकल्पासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि साठवण क्षमता लक्षात घेऊन नियोजनबद्ध काम करुन सुमारे ३१० किमी लांबीचे नाला खोलीकरण पुर्ण करण्यात आले आहे. पहिल्याच पावसात हे सर्व जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागाचा सिंचनचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत झाली आहे.

 

या जलसंधारणाच्या कामांमुळे केवळ पाणीच साचले नाही, तर परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या नाला खोलीकरण आणि पाझर तलावांमुळे धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतजमिनीला आणि पिकांना याचा थेट फायदा होणार आहे. विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) पाणीपातळी वाढणार असल्याने रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांचे पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान व्हायचे. मात्र, यंदा नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला. परिणामी, शेतात पाणी साचून होणारे पिकांचे नुकसान टळले आहे. गेल्या अनेक वर्षांत जे काम झाले नाही, ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि भगीरथ प्रयत्नांमुळे शक्य झाले, अशा भावना व्यक्त करत परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button