चोपडा :गोतस्करी प्रकरणी आंदोलन, पाच दिवसांत कारवाईचे आश्वासन


चोपडा, दि.१६ शहरात १३ एप्रिल रोजी गोरक्षकांवर झालेल्या अमानुष दगडफेक आणि ७० गोवंशाला गर्दीचा फायदा घेऊन पसार करण्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत सकल हिंदू समाज आणि गो प्रेमींनी भव्य जाहीर मोर्चा काढला. श्रीराम मंदिर, गांधी चौक येथून बुधवारी १५ सायंकाळी काढलेल्या या मोर्चाला चोपडा शहर आणि तालुक्यातील हजारो हिंदू बांधवांनी, तरुण-युवा, ज्येष्ठ नागरिकांसह माता-भगिनींनी उत्साहात सहभाग घेतला. घोषणाबाजीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, गो तस्करी थांबवणे आणि गो माता संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी जोरदारपणे उपस्थित करण्यात आली.
सकाल हिंदू समाज व गो प्रेमी चोपडा तालुक्याच्या वतीने आयोजित या मोर्चात गो मातेच्या सन्मानासाठी मैदानात जमलेल्या मोर्चेकऱ्यांनी रस्त्यांवर उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. गोवंशाच्या संरक्षणासाठी राजमाता गो मातेच्या रक्षणासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचे सांगत मोर्चेकऱ्यांनी एकवाक्याने घोषणा दिल्या.
या मोर्चावेळी विविध हिंदू संघटना, गोसंरक्षण संस्था आणि स्थानिक नेत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्राणी संस्था संस्थापक बडोदा (गुजरात) नेहा दीदी पटेल, प्रा. डॉ. सुशील महाराज विटनेर, हंसराजजी महाराज मनुदेवी, संजय काका शर्मा (शिव प्रतिष्ठान धुळे), पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, चोपडा नगरपालिका गटनेते गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, संध्या महाजन, जीवन चौधरी, राकेश पाटील, अनिल वानखेडे, सागर नेवे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांनी बोलताना गो माता ही आपली राजमाता असल्याचे सांगत गो तस्करी तात्काळ बंद व्हावी आणि कठोर कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली. गो मातेच्या रक्षणासाठी प्रखर स्वर उपस्थित केला गेला.
आंदोलनाची तीव्रता आणि प्रशासनाशी संवाद
रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद
गोतस्करी प्रकरणी तीव्र आंदोलन छेडणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी संबंधित पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. “कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेतला गेला. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही चौकशीस वेळ लागेल, असे प्रशासनाकडून सांगितले गेले.
यावेळी रोहित निकम यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला. मोर्चेकऱ्यांशी चर्चा घडवून आणत पाच दिवसांत चौकशी पूर्ण करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला.



