राजकीय

प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा भाजपात जाहीर प्रवेश; गिरीषभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती

जळगाव: जिल्ह्याच्या राजकारणातील एक अनुभवी चेहरा आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षविस्तारासाठी होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, संजय दादा गरुड आणि अशोक भाऊ कांडेलकर यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी निर्णय

यावेळी बोलताना प्रभाकर अप्पा सोनवणे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि ना. गिरीषभाऊ महाजन यांनी जिल्ह्यात राबविलेले विकासाचे कार्य पाहून मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जनसेवेचा वारसा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी भाजप हेच योग्य व्यासपीठ आहे.”

दिग्गजांकडून स्वागत

ना. गिरीषभाऊ महाजन यांनी सोनवणे यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “प्रभाकर अप्पांसारख्या अभ्यासू आणि जनसंपर्क असलेल्या नेत्याच्या आगमनामुळे भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होईल.”

आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजुमामा भोळे यांनीही सोनवणे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपला मोठे बळ मिळाल्याचे नमूद केले. या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.दरम्यान भाजपा माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, भाजपा अण्णा नगर मंडळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील अण्णा नगर सचिव गिरीश वराडे मनोहर पाटील रामचंद्र पाटील शालीक पाटील कैलास चव्हाण सर प्रदिप पाटील समाधान धनगर आधार पाटील सदाआप्पा पाटील शेखर सोनवणे दिनेश सोनवणे निवृती पाटील वाडेकर सर रामसिंग चव्हाण सचिन सपकाळे जितेंद्र तायडे यांनी स्वागत केले तसेच भाजपा खंडेराव नगर मंडळ तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी,भाजपा माजी तालुकाध्यक्ष गोपाल भंगाळे, माजी पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष लखीचंद कोळी,माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे यांनी देखील स्वागत केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button