जळगाव: रिंग रोडवर ट्रॅफिक ‘जॅम’! एकीकडे रस्त्याचे काम तर दुसरीकडे वाहतूक कोंडी

जळगांव दि.28 (धर्मेंद्र राजपूत) जळगांव शहरातील अत्यंत वर्दळीच्या रिंग रोडवर सध्या अवैध पार्किंग आणि वाहतूक कोंडीने कहर केला आहे. एकीकडे रिंग रोडवरील नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता आधीच निम्मा बंद आहे, तर दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या बेकायदेशीर वाहनांमुळे जळगावकरांचा वाहतुकीचा श्वास कोंडला जात आहे.
काही व्यावसायिकांची मनमानी आणि ग्राहकांची गर्दी
रिंगरोड परिसरातील अनेक मोठे शोरूम, रुग्णालये आणि दुकानांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्थाच आहे की नाही? परिणामी, ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट मुख्य रस्त्यावरच उभी केली जात आहेत. अरुंद झालेल्या रस्त्यावर या अवैध पार्किंगची भर पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या रिंगरोड परिसरातून जाताना शाळा आणि महाविद्यालये असल्याने दिवसभरात तीन ते चार वेळा विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. ट्रॅफिक जाम आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या गाड्यांमधून वाट काढताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता पूर्ण झाल्यावरही हीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाला जळगावकरांचा थेट सवाल
या गंभीर समस्येकडे जळगावच्या महापौर दीपमाला काळे, महापालिका आयुक्त आणि याच प्रभागातून थेट विधानसभेत पोहोचलेले लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? पार्किंगची सोय नसलेल्या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का? की जळगावकरांना रोज असाच मनस्ताप सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.



