जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..


जळगाव दि. २ (धर्मेंद्र राजपूत) जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या पुढाकाराने धरणगाव तालुक्यातील वंजारी या गावात ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केले. बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा, करंज सारख्या स्थानिक प्रजातींची झाडांच्या रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरासह सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला

शाळेचा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पुढील पिढीमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार , जैन फार्म फ्रेश फूडचे कृषीसेवक योगेश महाले यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी मनीषा साळुंखे, ग्रामपंचायत सरपंच वंदना पाटील, सदस्य नामदेव साळवे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश चौधरी, प्रल्हाद साळवे, किरण लोखंडे, विजय महाजन, ग्रामस्थ तसेच कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, मुख्याध्यापक भिकन पाटील, संदेश शिरसाठ, पी. एस. पाटील, एस. आर. पाटील, राजेश पावरा, किरण पाटील, शुभांगी पाटील, एम. डी. अहिरे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला. लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी शाळा, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ संयुक्तपणे सांभाळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




