राजकीय

यशवंत कॉलनी परिसरात काँक्रीटची भिंत बांधून नाल्याचा प्रवाह बदलला? नगरसेवक नितीन बरडेंची आक्रमक भूमिका; प्रशासनाला धारेवर धरले

जळगांव (धर्मेंद्र राजपूत) दि.5 :जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरात एका बिल्डरकडून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बेकायदेशीरपणे बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यशवंत कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या नैसर्गिक नाल्यात काँक्रीटची भिंत आणि पिलर बांधून हा प्रवाह अडवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक यांनी केला आहे. या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्थानिक नगरसेवक नितीन बरडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी थेट घटनास्थळी जात संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले आणि हे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ पाडण्याची जोरदार मागणी केली.मनपाच्या कागदपत्रांत सरकारी जागेची नोंद महानगरपालिकेच्या अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास केला असता,

तिथे नैसर्गिक नाला असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतानाही संबंधित बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) शासकीय जागेत घुसखोरी करून थेट नैसर्गिक नाल्याच्या पात्रातच काँक्रीटची भिंत आणि पिलर उभे केले आहेत. या बेकायदेशीर बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बाधित झाला असून, परिसरातील रस्त्याची रुंदीही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परिणामी, आगामी पावसाळ्यात या परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापारेषणच्या (महावितरण) कारभारावर संतप्त सवाल

एकीकडे मनपाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे सुरू असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे याच नाल्याच्या पात्रात चक्क महावितरणकडून वीज पोल (खांब) उभारण्याचे काम सुरू आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी नाल्याच्या हद्दीत अशा प्रकारे वीज खांब उभारण्याची परवानगी दिलीच कशी? असा संतप्त सवाल नगरसेवक नितीन बरडे यांनी उपस्थित केला आहे.दुर्घटना घडण्याची दाट शक्यता पावसाळ्यात या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. मात्र, आता नाल्यात उभारलेले वीज पोल आणि काँक्रीटच्या भिंतीमुळे वाहून येणारा कचरा, झाडांच्या फांद्या आणि इतर घनकचरा तिथे अडकून पडेल. यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे थांबेल आणि यशवंत कॉलनी व आसपासच्या परिसरात पाणी शिरून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक बरडे यांनी दिला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button