खाकी वर्दीतील संवेदनशीलता! दिवंगत पोलीस अंमलदाराच्या चिमुकल्या मुलीला एसपी श्रीकांत धिवरे यांचा मायेचा आधार; कार्यालयात बोलावून केले कौतुक


जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि.21 कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झालेल्या यावल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार कै.भरत विठ्ठल कोळी यांच्या चिमुकल्या मुलीला जळगाव जिल्हा पोलीस दलाने खंबीर आणि मायेचा आधार दिला आहे. कै कोळी यांची मुलगी कु.अन्वी भरत कोळी हिने नुकतीच दुसरीची परीक्षा उत्तीर्ण करून तिसरीत प्रवेश केला आहे. या यशाचे कौतुक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्रीकांत धिवरे यांनी तिला विशेष निमंत्रण देऊन एसपी कार्यालयात बोलावले. यावेळी तिची अत्यंत आपुलकीने विचारपूस करत तिला शालेय उपयोगी साहित्य आणि भेटवस्तू देण्यात आले.

पितृछत्र हरवलेल्या अन्वीला दिला पालकासारखा धीर ९ एप्रिल २०२६ रोजी यावल पोलीस ठाण्याचे अंमलदार भरत कोळी यांचे अपघाती निधन झाले होते. या अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाला आणि पितृछत्र हरवलेल्या चिमुकलीला धीर देण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संवेदनशील पाऊल उचलले. त्यांनी अन्वीला मुद्दाम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले.आपुलकीचा संवाद आणि शैक्षणिक साहित्य भेट दिल्या
एसपी कार्यालयात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एखाद्या पालकाप्रमाणे अन्वीशी संवाद साधला. तिच्या अभ्यासाची, आवडीनिवडींची आणि आरोग्याची अत्यंत आपुलकीने चौकशी केली. अन्वी प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता दुसरीतून यशस्वीपणे तिसरीत गेल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले. तिला नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सुंदर दफ्तर, वह्या, खेळणी आणि इतर शालेय वस्तू भेट देण्या आल्या.
पोलीस दल नेहमीच कुटुंबाच्या पाठीशी खंबीर”
पोलीस दल हे केवळ एक प्रशासन नसून एक मोठे कुटुंब आहे. आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जळगाव पोलीस दल सदैव खंबीरपणे उभे राहील,” असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला.पोलीस अधीक्षकांच्या या कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रमामुळे खाकी वर्दीतील मानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून, डिजिटल मीडिया आणि सर्वच स्तरांतून जळगाव पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.




