स्थानिक बातम्याराजकीय

जळगावात ‘बळी तो कान पिळी’! गरिबांच्या पोटावर पाय, धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना मनपाचं अभय?

जळगाव (धर्मेंद्र राजपूत):दि.17 जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अजिंठा चौफुली परिसरात केलेल्या कारवाईमुळे प्रशासनाचा ‘दुटप्पी’ चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “कायदे केवळ गरिबांसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल आता जळगावकर विचारत आहेत. एका बाजूला हातावर पोट असणाऱ्या छोट्या टपरीधारकांचे संसार रस्त्यावर फेकले जात असताना, दुसरीकडे मात्र महामार्गाला गिळंकृत करणाऱ्या मोठ्या धेंडांच्या बांधकामांकडे मनपाने हेतुपुरस्सर डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.

कारवाईचा फार्स; गरिबांवरच गाजली कुऱ्हाड

१. सुवर्ण बाजार (नो पार्किंग झोन): जळगावची ओळख असलेल्या सुवर्ण बाजारात अनेक व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. यामुळे शहराच्या मुख्य भागात मोठी वाहतूक कोंडी होते. मनपाने याकडे लक्ष देऊन ही जागा मोकळी करावी.
२. स्टेशन रोडवरील हॉटेल्स: रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक हॉटेल चालकांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृत बांधकामे आणि शेड उभारले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी हे अतिक्रमण निघणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान अजिंठा चौफुली हा शहराचा गजबजलेला परिसर. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अतिक्रमण काढणे आवश्यक आहेच, मात्र हे करत असताना मनपाच्या पथकाने केवळ गरीबांच्या छोट्या टपऱ्या आणि हातगाड्यांवरच आपला मोर्चा वळवला. ज्यांच्याकडे सत्ता आणि संपत्तीचे बळ आहे, अशा मोठ्या शोरूम्स आणि हॉटेल्सनी केलेल्या पक्क्या अतिक्रमणांना स्पर्श करण्याची हिंमतही प्रशासनाने दाखवली नाही. ही कारवाई म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी केलेला ‘फार्स’ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

प्रशासनाचा ‘अर्थपूर्ण’ डोळेझाकपणा?

जर अतिक्रमण काढायचे असेल तर ते सरसकट काढले पाहिजे. नियमांची अंमलबजावणी करताना ‘चेहरा’ पाहून केली जाणारी कारवाई ही लोकशाहीचा अपमान आहे. गरिबांना उद्ध्वस्त करून शहराचा विकास साधता येत नाही. जोपर्यंत बड्या धेंडांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालत नाही, तोपर्यंत मनपाची ही मोहीम केवळ ‘अत्याचार’ म्हणूनच ओळखली जाईल.

जळगावकरांचा संतप्त सवाल:

मोठ्या शोरूम्सच्या वाढीव बांधकामांना प्रशासन कधी हात लावणार?

केवळ गरिबांचे संसार रस्त्यावर आणून शहराचा विकास होणार का?

कारवाईत पारदर्शकता का नाही?

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button