“महायुतीचा पेच वाढणार! जागावाटपामुळे स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस; अनेक आजी-माजी नगरसेवकांचा बंडाचा पवित्रा.”


जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या मुलाखतींचे सत्र पार पडले आहे. मात्र, तिकीट वाटपाचा अंतिम निर्णय जवळ येत असतानाच शहरातील विविध प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला स्पष्ट संकेत दिले आहेत—”जर वशिलेबाजीमुळे किंवा कोणाच्या सांगण्यावरून आमचे तिकीट कापले गेले, तर बंडखोरी अटळ आहे.” एक निष्ठ नवलच का ? यामुळे आता अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
निष्ठेने काम करणाऱ्यांची उपेक्षा नको
जळगाव शहरात अनेक इच्छुकांनी गेल्या काही वर्षांपासून आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवला आहे. पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक आंदोलने आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. “प्रभागात नाव आहे, आर्थिक ताकद आहे आणि निवडून येण्याची क्षमता (Winability) असूनही जर केवळ वरिष्ठ नेत्यांच्या व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मर्जीतील उमेदवाराला उमेदवाराला तिकीट दिले गेले, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ होत आहे.
बंडखोरी: पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी धोक्याची घंटा
या निवडणुकीत बंडखोरी झाल्यास त्याचा थेट फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बसणार आहे. जर सक्षम बंडखोर उमेदवार रिंगणात उतरला, तर तो पक्षाची हक्काची मते खाईल, ज्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. किंवा बंडखोर उमेदवार स्वतः निवडून आला, तरी त्या जागांवर पक्षाचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे तिकीट वाटप करताना पक्षाने केवळ नेत्यांचे ऐकण्यापेक्षा जमिनीवरील वास्तव तपासणे गरजेचे आहे.
‘सक्षम’ उमेदवाराचा शोध की जुन्यांनाच संधी?
काही प्रभागांमध्ये विद्यमान किंवा जुने उमेदवार आता निष्प्रभ ठरत आहेत. अशा ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे अपेक्षित आहे, जे काम करण्यास सक्षम आहेत. मात्र, केवळ ‘जुने जाणते’ म्हणून अकार्यक्षम उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास जनता त्यांना नाकारू शकते. याउलट, काही प्रभागांमध्ये वर्षाानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला संधी दिल्यास, मतदार आणि कार्यकर्ते दोघांचाही रोष ओढवून घ्यावा लागेल.
जनतेचा कौल आणि आत्मचिंतनाची गरज
कार्यकर्त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, “आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, पण जर पक्षाने आम्हाला गृहीत धरले, तर आम्ही अपक्ष लढून आपली ताकद दाखवून देऊ. शेवटी प्रभागाचा खरा विकासक कोण, हे जनता मतपेटीतून सिद्ध करेलच.”
त्यामुळे तिकीट वाटपाच्या या शेवटच्या टप्प्यात, जळगावमधील सर्वच प्रमुख पक्षांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. केवळ कोणाच्या शिफारशीवरून तिकीट न देता, ‘मेरीट’ आणि ‘इलेक्टिव्ह मेरिट’ (Elective Merit) पाहूनच निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा पक्षांना मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.




