राजकीयस्थानिक बातम्या

महापौर स्वच्छता संकल्प अभियान: महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रभाग क्र.९ ची पाहणी

कचरा वाहनांची अनियमितता, सर्विस रोडवरील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव :दि.27 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी ‘महापौर स्वच्छता अभियाना’अंतर्गत सोमवारी (दि. २६) प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विविध नागरी समस्यांची सखोल पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान स्वच्छता, आरोग्य, पथदिवे, टवाळखोरांचा उपद्रव आणि वाहतूक कोंडी यांसारख्या विविध मुद्द्यांवर त्यांनी कडक निर्देश दिले.

 

गटारी साफसफाई अन् पथदिव्यांची दुरुस्ती

पाहणी दरम्यान कचरा उचलणारे ट्रॅक्टर अनियमित येत असल्याची माहिती आरोग्य निरीक्षकांनी महापौरांना दिली. त्यावर ट्रॅक्टर नियमित करण्याचे निर्देश त्यांनी बीव्हीजी कंपनीच्या सुपरवायझरला दिले. तसेच परिसरातील गटारींची तात्काळ साफसफाई करावी, अनेक ठिकाणी बंद असलेले पथदिवे दुरुस्त करावेत आणि एसएमआयटी कॉलेजजवळील विद्युत विभागाचा पोल लवकरात लवकर स्थलांतरित करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मुक्ताईनगर परिसरात लोंबकळणाऱ्या धोकादायक केबल्स तात्काळ काढून टाकण्याचे सूचनाही दिल्या.

जवळच शाळा असलेल्या ऑक्सिजन पार्क परिसरात काही टवाळखोर गांजा व दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महापौरांकडे केली. या समस्येची गंभीर दखल घेत महापौरांनी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच ऑक्सिजन पार्कमध्ये तात्काळ पथदिवे बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 

आरोग्य मंदिरात औषधांचा तुटवडा; दुकानांमधील डस्टबिनची तपासणी

महापौरांनी परिसरातील महापालिकेच्या आरोग्य मंदिरालाही भेट दिली. येथे एक आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि कर्मचारी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले, मात्र काही आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. याशिवाय, महापौरांनी परिसरातील दुकानांमध्ये कचऱ्यासाठी ‘डस्टबिन’ ठेवले आहेत की नाही, याचीही पाहणी केली. ऑक्सिजन पार्कजवळ सुरू असलेल्या भुयारी गटाराच्या कामाची त्यांनी पाहणी केली.

 

गुजरात पेट्रोल पंपाच्या समोर पुलाखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात हलवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. याच पुलाजवळ असलेल्या बिअर बार आणि हॉस्पिटलच्या समोर त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांनी सर्विस रोडवर अस्ताव्यस्त गाड्या पार्क केल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. यावरून महापौरांनी बार व हॉस्पिटल चालकांना चांगलाच जाब विचारला. हॉस्पिटलमध्ये वॉचमन नसल्याने वाहनधारक कसेही वाहने उभी करत असल्याचे समोर आले. बार चालकांनी देशी दारू दुकानाच्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

 

यावेळी स्थानिक नगरसेवक तथा उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जयश्री राहुल पाटील, प्रतिभा गजानन देशमुख, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे तसेच पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button