अनुभूती शाळा व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे १४ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम; बालकलाकारांना सहभागी होण्याचे आवाहन
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!


जळगाव दि.24 (धर्मेंद्र राजपूत) : बालकांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुभूती बालनिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन बालकलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात ४ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. गायन, वाद्य वादन, नृत्य, नाट्यछटा, नाटिका आणि एकपात्री अभिनय अशा विविध कलाप्रकारांतून बालकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. एकल तसेच सामूहिक स्वरूपात सादरीकरण करता येणार असल्याने मुलांना आपल्या आवडीनुसार सहभाग नोंदविता येईल.

बालकांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि कलेच्या माध्यमातून त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बालकलाकारांनी २५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शुभदा नेवे ८३२९३७५०५७ यांच्या शी संपर्क साधावा.



