राज्य

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

जळगाव, दि.6 (धर्मेंद्र राजपूत) : हिरोशिमा दिनानिमित्त जळगाव येथील गांधी उद्यान येथे गुरुवारी ६ रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन व हरिजन सेवक संघाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा व नागासाकीवर झालेल्या अणुबाँब हल्ल्याच्या स्मृतींना अभिवादन करत जगात शांतता, बंधुता आणि अहिंसेचा संदेश दृढ व्हावा, तसेच अशा विनाशकारी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, रामकुमार मंडल, निशा त्यागी यांच्यासह गांधी तीर्थचे उदय महाजन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि विश्वशांतीच्या विचारांचे स्मरण करून समाजात सलोखा व सद्भावना वाढविण्याचे आवाहन केले.

 

दरम्यान, गांधी तीर्थ येथे हरिजन सेवक संघाचे ७ ऑगस्ट पासून तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत असून, देशाच्या विविध राज्यांतील तसेच परदेशातून आलेले सुमारे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. विविध गांधीवादी, समाजसेवक, विचारवंत आणि कार्यकर्ते यावेळी गांधी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर चर्चा करून आगामी काळातील कार्याची दिशा निश्चित करणार आहेत.

 

या अधिवेशनाला संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सचिव मधुकर शिरसाठ, राजीव देशपांडे, जळगाव जिल्हा हरिजन सेवक संघाचे शंभू पाटील तसेच संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रे, संवाद आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button